अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाची गरज पडू नये – नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अनाथ मुलींसमोर उलगडला जीवन प्रवास

पुणे : देशात रोडकरी-पुलकरी म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी आज गुरुवारी अनाथ मुलींसमोर आपला जीवन प्रवास उलगडला आहे. अत्यंत धकाधकीच्या वेळापत्रकात गुरफटलेले गडकरी यांना आज अनाथ मुलींनी अनेक प्रश्न विचारले या प्रश्नाचे दिलखुलास उत्तरे देत त्यांनी आपला प्रोटोकॉल बाजूला ठेऊन मनमोकळेपणाने मुलींशी गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या संस्थेला अकरा लाख रुपयांची मदत जाहीर केली.

अनाथांची माई पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या ममता बाल सदन (बालगृह) कुंभारवळण (ता. पुरंदर जिल्हा पुणे) या अनाथ मुलींच्या आश्रमाला आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज गुरुवारी दुपारी एक वाजता सदिच्छा भेट दिली. माईंच्या लेकींशी आपुलकीचा संवाद या कार्यक्रमात त्यांनी माईंच्या लेकींशी संवाद साधला. सर्व प्रथम माईंचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड यांनीं त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह भेट देऊन स्वागत केले. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त तिरंगाध्वज भेट दिला.

यावेळी आश्रमातील कु. मिनलने त्यांना, ‘साहेब तुमचं देशात खूप मोठं नाव आहे, तुमच्या बद्दल आम्ही जेव्हा ऐकतो, तुम्ही इथं येणार म्हणून आम्हाला तुमच्याबद्दल खूप उत्सुकता होती. दरवेळी आम्ही तुम्हाला बातम्यांमध्ये वाचले होते, टीव्हीवरच पाहिले होते. तुमच्या मुलाखती बघितल्या होत्या, आज आम्हाला सगळ्यांना तुम्हाला जाणून घ्यायचे आहे कि, तुम्ही राजकारणात पहिल्यापासून आलात कि घरून पाठबळ मिळालं, तुमचा शाळकरी ते गडकरी प्रवास तुमच्या तोंडून एकायचाय? असा प्रश्न विचारताच गडकरी खळखळून हसले आणि तिच्या प्रश्नाला दिलखुलास उत्तर दिल.

प्रश्नाला उत्तर देतांना गडकरी म्हणाले कि, ‘मी जगात तिन्ही भाषेत बोलतो, त्यामुळे लोक माझं खूप ऐकत असतात. पण मी माझं भाषण ऐकत नाही. मी खूप मोठा नाही, पण युट्युबकडून मला जेव्हा अडीच ते तीन लाख रुपये मिळाले तेव्हा मला प्रचिती आली कि आपण खरेच मोठे आहोत. मी वाचून बोलत नाही, जे मनात येईल ते बोलतो. मी नेहमीच नव्याचा शोध घेत असतो, नव्या तंत्राचा अधिकाधिक उपयोग कसा करून घेता येईल यावर माझा भर असतो. मग रस्ते असो, शेती असो, मार्केटिंग की वाहनांचा विषय असो. एकदा विषय हाती घेतला कि तो पूर्ण करतो. थांबत नाही. प्रत्येक क्षेत्रात नवीन नवीन गोष्टींचा अवलंब कसा करता येईल याचा सतत ध्यास धरतो. त्यासाठी संबंधित तंत्राची माहिती जाणून घेत असतो. ‘मै तो चला, जिधर चले रस्ता, मुझे क्या पता, मेरी मंझिल है कहा’, असे म्हणत गडकरी यांनी मनसोक्त उत्तरे दिली.

तुमची आणि माईंची ओळख कशी आणि कुठे झाली असा प्रश्न कु. मयुरीने केला. त्यावर उत्तर देतांना गडकरी म्हणाले कि, माईंची भेट माझी सोलापुरात एका कार्यक्रमात झाली. सोलापुरात माईंच्या भाषणाने लोकांचे अश्रू अनावर झाले, तेव्हा शाल फिरवून ‘तुम्हाला शक्य होईल तेवढी मदत करा, पैसे झोळीत टाका, माईंच्या कार्याला मदत करा, असे मी लोकांना सांगितले तेव्हा माईंना बरीच मदत झाली. माई माझ्याकडे नेहमी येत, शक्य होईल तेव्हा मी त्यांना मदत करायचो असं सांगत त्यांनी सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या आठवणींना उजाळा दिला. माईंच्या आठवणींना उजाळा देतांना गडकरी म्हणाले कि, माईंचा आणि माझा जवळचा संबंध होता. त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपला जीवन प्रवास केला. अनेक यातना सहन केल्या. त्यांचा अनेक प्रकारे उपहास झाला, अपमान झाला पण त्या डगमगल्या नाहीत. त्या सतत काम करीत राहिल्या. समाजातल्या ज्याला कोणीच नाही त्याला माईंनी आधार दिला. अश्या मुला-मुलींचे पालकत्व स्वीकारले. मी अगदी जवळून त्यांचं कार्य बघितलं आहे. ममता बाल सदनला भेट दिल्यावर माईंच्या कार्याची अधिक जाणीव होते. त्यांचे कार्य ईश्वरीय कार्य होते ते थांबता कामा नये. दिपकदादा, तुम्ही आणि माईंची सर्व लेकरं माईंच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जात आहात हे बघून मला आज आनंद होतोय. आज माई हयात नाहीत, त्यांच्या संस्थेत भेट देऊन त्यांच्या कार्याचा मला अभिमान वाटतो. तुम्ही अभ्यास करून एखादा प्रोजेक्ट केंद्र सरकारकडे सादर करा, मी तुम्हाला मदत करेल अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.

तुम्ही सर्व मुली येथून चांगलं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन उंच भरारी घ्या. मोठे झाल्यावर तुम्हाला चांगली नोकरी मिळेल तेव्हा तुम्ही हि अश्याच रीतीने समाजाला मदत करा असे आवाहन त्यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या जे मनात असते ते बोलून रिकामे होतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले असते. त्याचा प्रत्यय आज मुलींना आला. चिमुकल्या मुलींनी नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. यावेळी ते मुलांमध्ये रमल्याचे दिसून आले. प्रास्ताविकातून ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड यांनी माईंच्या सर्व संस्थाची माहिती दिली. तसेच आज या सर्व संस्था चालवितांना अनेक अडचणी उभ्या राहतात. भविष्यात या सर्व संस्था सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी गडकरी यांच्याकडे केली. शेवटी त्यांनी जाता-जाता अकरा लाख रुपयाची मदत देण्याचे कबुल केले. या प्रसंगी कु. आकांक्षा हिने गडकरी यांचे उत्तम रेखाचित्र रेखाटले होते सदर चित्र भेट देतातच गडकरी यांनी थँक यु सो मच म्हणत तीचे आभार मानले. कु. सारिका हिने माईचा जीवनपट उलगडला. यावेळी ममता सपकाळ, अधीक्षिका स्मिता पानसरे, विनय सपकाळ, तहसीलदार विक्रम राजपूत, सरपंच मंजुषा गायकवाड यांच्यासह ममता बाल सदनचे सर्व मुली कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाची गरज पडू नये – गडकरी

आपण समाजात वृद्धाश्रम म्हणतो, अनाथाश्रम म्हणतो. पण मला वाटते कि, असा समाज घडला पाहिजे कि, समाजाला वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रम याची गरज पडू नये. परंतु दुर्भाग्याने हि परिस्थिती बदलण्यास वेळ लागेल. त्यामुळे जे शिकू शकत नाही, ज्यांना आधार नाही, अश्या निराधार, निराश्रित माणसाला जवळ करणे त्याच्यावर चांगले संस्कार करणे त्याला चांगले शिक्षण उपलब्ध करून देणे त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभं करणे हेच माईंचे स्वप्न होते. माईंचे ते स्वप्न तुम्ही पूर्ण करीत आहेत याचा देखील आनंद आहे. जर माई भेटल्या नसत्या तर या मुलांचं काय झालं असत, हा हि एक मोठा प्रश्न आहे असे हि गडकरी म्हणाले.

गडकरींनी जोडले चिमुकल्यांना हात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ममता बाल सदनमध्ये आगमन होताच प्रवेशद्वारावर कुमकुम तिलक लावून मुलींनी त्यांचे स्वागत केले. सभागृहात येत असतांना त्यांना अकरा चिमुकल्या मुलींनी वेलकम सर…वेलकम सर म्हणत अकरा गुलाबपुष्प भेट दिले. चिमुकल्यांच्या या कृतीने गडकरी भारावून गेलेत. सभागृहात आगमन होताच मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला तेव्हा त्यांनी दोन्ही हात जोडून वाकून आदराने सर्व मुलींना नमस्कार केला. उच्च पदावर असलेल्या गडकरींनी आपल्यातील बापमाणूस जिवंत असल्याची जाणीव सभागृहात सर्वांना करून दिली.