पुण्यातील ‘त्या’ सुपरहिरोंना गृहमंत्री फडणवीसांचा फोन; लेशपाल आणि हर्षलचं केलं कौतुक

पुणे : काल सदाशिव पेठेमध्ये भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या नराधमाला आपल्या जीवाची पर्वा न करता त्याला पकडून त्या मुलीचा जीव वाचवणारे हर्षल पाटील (Harshal Patil) यांचा भारतीय जनता पार्टी (BJP) पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष जगदिश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवाय जगदीश मुळीक यांनी हर्षल पाटील आणि लेशपाल जवळगे यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क जुळवून आणला.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन तरुणांचं कौतुक केलं आहे. फोनवरुन फडणवीसांनी या दोघांशी संवाद साधला. दोन्ही जिगरबाज तरुणांनी सजग नागरिक म्हणून दाखवलेलं धाडस प्रशंसनीय आहे, या शब्दांत फडणवीसांनी दोघांवरही कौतुकाची थाप टाकली.

गृहमंत्री फडणवीसांनी स्वतःहून फोन करुन कौतुक केल्यानं लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांनी त्यांचे आभार मानले. तसेच तुमच्याशी बोलल्यानं खूपच छान वाटलं अशा शब्दांत लेशपालनं आनंद व्यक्त केला.