मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनला मंजुरी देण्याचा तातडीचा निर्णय म्हणजे गुजरातसमोर झुकण्याचा प्रकार ?

मुंबई – बेकायदेशीर सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचा मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनला (Mumbai-Ahmedabad bullet train) मंजुरी देण्याचा तातडीचा निर्णय म्हणजे गुजरातसमोर झुकण्याचा प्रकार असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील मुळगावी दोन हॅलिपॅड आहेत मात्र अत्यावश्यक सोयीसुविधांचा अभाव आहे. शाळकरी मुलांना होडीने प्रवास करावा लागतोय. रस्ते, पूल (Roads, bridges) नाहीत याबाबत सुमोटो अंतर्गत याचिका उच्च न्यायालयाने दाखल करुन घेत सरकारवर ताशेरे ओढले आहेत असेही महेश तपासे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनला तत्परतेने मंजूरी द्यायला वेळ आहे आणि सोयीसुविधांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व ते करतात त्या ठाणे जिल्हयाला वाहतूक कोंडी, नागरी समस्यांनी ग्रासले आहे. याबाबत त्यांच्याकडे वेळ नाही मात्र गुजरातसाठी धावणार्‍या बुलेट ट्रेनला मंजुरी द्यायला वेळ आहे असा टोला लगावतानाच महाराष्ट्राच्या प्रश्नावरदेखील तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.