नानांच्या नाराजीनंतरही ठाकरे गटाकडून कॉंग्रेसला खिंडार पाडण्याचे काम सुरूच

करमाळा –  माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे सुपुत्र आणि युवक कॉंग्रेसचे नेते वैभवराजे जगताप (Vaibhavraje Jagtap) यांनी अखेर कॉंग्रेसला राम-राम ठोकला आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेसला राम राम ठोकणाऱ्या जगताप यांनी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

एका बाजूला महाविकास आघाडी ऐक्याच्या बाता मारत असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून अनेक कॉंग्रेसच्या नेत्यांना थेट प्रवेश दिले जात आहेत. नुकताच महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप  यांनी ठाकरे गटात प्रवेश दिल्याने कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच नाराज झाले होते. मात्र त्यांच्या नाराजीची अजिबात दखल न घेता ठाकरे गटाने फोडाफोडी सुरूच ठेवल्याचे दिसून येत आहे.