बँकेने २००० हजारांची नोट बदलून देण्यास नकार दिल्यास काय करावे? येथे करू शकता तक्रार

RBI 2000 Currency Notes: सरकारने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा करताना आरबीआयने सांगितले की, क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2000 रुपयांची नोट चलनात बंद होऊ शकते, परंतु 2000 रुपयांची नोट कायदेशीररित्या वैध राहील. आरबीआयने म्हटले आहे की 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. तसेच, बँका आणि आरबीआयच्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा इतर मूल्यांच्या चलनासोबत बदलल्या जाऊ शकतात.

2000 रुपयांच्या नोटा कधी आणि किती बदलता येतील?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी कोणतेही बंधन नाही. मात्र, त्यासाठी नंतर सविस्तर नियम जारी केले जातील. या नोटा 23 मे पासून बदलता येतील. 2000 रुपयांची नोट, 20 हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच एकाच वेळी 10 नोटा बदलता येतील. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा बदलता येतील.

कोणी नोटा बदलून देण्यास नकार दिल्यास काय करावे?
तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील आणि तुम्हाला त्या बदलून घ्यायच्या असतील तर तुम्ही बँकेत जाऊन त्या जमा करू शकता. 30 सप्टेंबर 2023 पूर्वी, जर दुकानदार, बँक शाखा किंवा इतर कोणत्याही बँकेने 2000 रुपये घेण्यास नकार दिला तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता.

जर कोणती बँक नोट बदलून देण्यास नकार देत असेल तर तुम्ही प्रथम संबंधित शाखेच्या बँक व्यवस्थापकाकडे तक्रार करू शकता. तक्रार नोंदवल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत बँकेने प्रतिसाद न दिल्यास किंवा तक्रारदार बँकेने दिलेल्या उत्तरावर/निर्णयावर समाधानी नसल्यास, तो एकात्मिक लोकपाल अंतर्गत आरबीआयच्या तक्रार व्यवस्थापन प्रणाली पोर्टल cms.rbi.org.in वर तक्रार नोंदवू शकता.