Mumbai – राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आता राज्यात सत्तांतर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोर आमदार, अपक्ष आमदार आणि भाजपच्या मदतीने नवे सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, या बंडाच्या भूकंपाचे अजूनही धक्के शिवसेनेला बसत असून अनेक नेते आता शिंदे गटात सामील होत आहेत.
यातच आता शिवसेनेचे सरचिटणीस, खासदार विनायक राऊत (Vinayak Raut)यांनी बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर टीका केली आहे. सात वर्षातलं तुमचं शिवसेनेतील आयुष्य, चार वर्षांत तुम्हाला म्हाडाचं मंत्रीपद दिलं. खोऱ्याने ओढलं, फावड्याने ओढलं, त्यांनी कधी विचारलं नाही, असा टोलाही विनायक राऊत यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांना सर्वात जास्त जवळ केले. किमान आदित्य यांनी भरवलेल्या फ्रँकीची आणि अन्नाची तरी किंमत ठेवायची होती, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.
प्रत्येक बंडखोर आमदाराने 50 ते 60 खोके घेतले, शिवसेना संपवण्याचे भागीदार झाल्यास तुमची जागा नरकात असेल. तुमच्या जाण्याची आम्हाला किंमत नाही. पण यापुढे कोणत्याही गद्दाराला शिवसेनेमध्ये प्रवेश मिळणार नाही, असे म्हणत राऊतांनी उदय सामतांना खडसावले.