‘विधान परिषदेची निवडणूक अटीतटीची होणार, मात्र जिंकणार तर भाजपच’ 

Mumbai –  विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीत केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे तर त्या निवडणुकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीत (MVA) अविश्वासाचे वातावरण आहे.

दरम्यान,  विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागलं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतील. त्यामुळे क्रॅास वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीत लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचेही महत्त्व वाढले आहे.

भाजपानं जिंकण्याची रणनीती आखली आहे. राज्यातील आमदार घोडेबाजाराने विकला जात नाही. चांगले संबंध, मैत्री असते त्यातून मदत होत असते असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (BJP Vinod Tawade) यांनी व्यक्त केला आहे. तावडे म्हणाले की, विधान परिषदेची निवडणूक अटीतटीची होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतही भाजपाबाबत विविध विधानं केली जात होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यसभेत जसा विजय मिळाला तसाच विधान परिषद निवडणुकीत मिळेल. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नाही हे वारंवार आघाडीतील घटक पक्ष दाखवून देत आहे. त्यामुळे विधान परिषदेतही पाच उमेदवार भाजपा निवडून आणले असा विश्वास आहे.