आंदोलनादरम्यानची स्टंटबाजी पडली महागात; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जीव मुठीत घेवून पळाले   

उस्मानाबाद – उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सध्या चांगलेच चर्चेचा मुद्दा बनले आहे.  पेट्रोल (petrol) , डिझेलसह घरगुती गॅसचेही दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी ही डोकेदुखी ठरत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. याच डोकेदुखीवर उपाय म्हणून आंदोलकांनी झंडूबामचे (zandu bam) वाटप केले.

दरम्यान, आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैलगाडीत मोटरसायकल टाकून आणली. पेट्रोलचे भाव परवडत नसल्याने असे प्रतिकात्मक आंदोलन त्यांनी केले. मात्र या आंदोलनानंतर अधिक स्टंट बाजी करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी मोटरसायकलवर पेट्रोल ओतले.

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरु होती. इतक्यात कुणीतरी आगपेटीची काडी पेटवली आणि सेकंदाच्या आत गाडीचा भडका उडाला. यामुळे आजूबाजूचे कार्यकर्ते चांगलेच घाबरले. चुकून जरी कुणी गाडीच्या अगदी जवळ असते, तर हे एखाद्याच्या जीवावर बेतले असते.