स्वर झंकार महोत्सवात व्हायोलिन – सतार जुगलबंदीत रसिक दंग

पुणे  : गुलाबी थंडीच्या साथीने सादर होणारे गावती, पिलू, देस असे विविध राग, व्हायोलिन व सतारच्या सुरावटी आणि त्यानंतर सादर झालेल्या दमदार जुगलबंदीने रंगलेली एक सुरेल संध्याकाळ रसिकांनी अनुभविली.

व्हायोलिन अकादमी आयोजित व बढेकर ग्रुप प्रस्तुत १४ व्या स्वर झंकार महोत्वसात (SwarZankar) तिसऱ्या दिवशीच्या उत्तरार्धातील सत्रात प्रसिद्ध सतारवादक पद्मश्री उस्ताद शाहिद परवेज यांचे सतारवादन सादर झाले. त्यांनी राग गावती’ने आपल्या सादरीकरणाची सुरूवात केली. त्यामध्ये आलाप, जोड, ज्हाला, ज्हपतालमध्ये एक रचना सादर केली. त्यानंतर खमाज रागातील रचना सादर करत, मांड रागाची हलकीशी झलक त्यांनी आपल्या वादनातून सादर केली. दादरा तालात तबल्याच्या साथीने उस्ताद रईस खाँ यांची अफगाणी अनर-अनर धून सादर करत, त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना मुकेश जाधव ( तबला) यांनी साथ केली.

त्यानंतर सादर झालेल्या पंडित अतुलकुमार उपाध्ये आणि उस्ताद शाहिद परवेझ यांच्या व्हायोलिन – सतार जुगलबंदीने महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सांगता झाली. राग पिलू’ने त्यांनी आपल्या सादरीकरणास सुरूवात केली. त्यामध्ये दादरा, द्रुत तीन तालमधील रचना त्यांनी सादर केल्या. या विशेष जुगलबंदीसाठी मुकेश जाधव यांनी तबल्यावर अतिशय समर्पक साथ केली.