अजब योगायोग : बाबुश यांच्या स्मृतीदिनी मतदान; मतदानरुपी आशीर्वाद जोशुआला मिळणार

म्हापसा : म्हापसा मतदार संघातून आमदार जोशुआ डिसुझा यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांचे सुपुत्र असणारे आमदार जोशुआ डिसुझा यांच्याविरोधात कधीकाळी फ्रान्सिस डिसुझा यांच्या छत्रछायेत राजकारणाचे धडे गिरवणारे सुधीर कांदोळकर हे मैदानात उतरले आहेत.

फ्रान्सिस डिसुझा हे बाबुश या नावाने ओळखले जात होते. म्हापसा मतदारसंघात अनेक विकासकामे त्यांनी आपल्या कारकिर्दीत पार पाडली. सर्वसामान्यांशी त्यांचा थेट संवाद असल्याने ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते असे म्हटले तरीही काही वावगे ठरणार नाही. स्व. मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापश्याच्या विकासासाठी ते अहोरात्र झटत होते हे जनता विसरलेली नाही.

दरम्यान, बाबुश यांनीच घडवलेले सहकारी हे आज त्यांच्याच सुपुत्राच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. गोव्यात मतदान १४ फेब्रुवारी रोजी पार पडणार असून याच दिवशी फ्रान्सिस डिसुझा यांचा स्मृतिदिन देखील आहे. हा अजब योगायोग यावेळी आल्याने बाबुश यांच्यावर प्रेम करणारी जनता बाबुश यांच्या स्मृतीदिनी मतदानरुपी आपला आशीर्वाद जोशुआ यांना देईल असा अंदाज वर्तविला जात आहे.