‘काश्मिरी पंडितांसोबत जे घडलं, ते अत्यंत दु:खद; प्रत्येक भारतीयाने ‘द कश्मीर फाइल्स’ पहायला हवा’

मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, एका बाजूला ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून काही वाद देखील निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता अभिनेता आमीर खान याने या चित्रपटाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, द काश्मीर फाईल्स हा चित्रपट मी नक्की पाहीन. कारण इतिहासातील ते एक असं पान आहे, ज्यामुळे आपलं मन दुखावलंय. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत जे घडलं, ते अत्यंत दु:खद आहे. अशा विषयावर जर चित्रपट बनवला असेल तर प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पहायला हवा.

एखाद्या व्यक्तीवर अत्याचार होत असेल तर त्याची काय अवस्था होत असेल, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. माणुसकीवर ज्या लोकांना विश्वास आहे, त्यांच्या भावनांना हा चित्रपट स्पर्श करतो. त्यामुळे मी हा चित्रपट आवर्जून पाहीन. हा चित्रपट यशस्वी ठरतोय, याचाही मला खूप आनंद आहे,” अशा शब्दांत त्याने प्रतिक्रिया दिली.