राजकारणाशी संबंध नसलेल्या घटनांना राजकीय रंग देणे चुकीचे आहे – लोबो

पणजी : पीडितांना न्याय देण्यासाठी, वास्को आणि केपे येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यासह आमदार संकल्प आमोणकर, माध्यम अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, सरचिटणीस जनार्दन भंडारी, युवा कॉंग्रेसअध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, महिला अध्यक्षा बिना नाईक, अर्चित नाईक, साईश आरोसकर, अमित पाटकर, विवेक डिसिल्वा, विरेन शिरोडकर आदींनी पोलीस महासंचालक कार्यालयाला यासंदर्भात सोमवारी निवेदन दिले.

पत्रकारांशी बोलताना लोबो म्हणाले की, राजकारणाशी संबंध नसलेल्या घटनांना राजकीय रंग देणे चुकीचे आहे, परंतु सत्तेत आल्यावर भाजपने असे प्रकार करण्यात सुरुवात केली आहे. काही विद्यार्थ्यांना सुद्धा गरज नसताना या प्रकरणात त्रास दिला जात आहे आणि त्यांना चौकशीसाठी बोलावले जात आहे. भाजपच्या इशाऱ्यावर पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे थांबवावे. असे लोबो म्हणाले.

वास्को येथे घडलेल्या हिंसाचाराच्या नुकत्याच झालेल्या घटनेने सत्ताधारी पक्ष समर्थकांच्या फायद्यासाठी आणि विरोधकांना त्रास देण्यासाठी सत्तेचा कसा वापर करत आहे हे उघड झाले आहे. पोलिस आपल्या नैतिक आणि जबाबदारीचा आदर न करता आपल्या राजकीय बॉसचे समाधान करण्यासाठी कसे वागले आहेत हे लोकांनी बघितले आहे. ही गोष्ट लज्जास्पद आहे. पोलिसांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

पोलिस निष्पक्षपणे तपास करण्यात अपयशी ठरले असून संपूर्ण तपास आता भाजपच्या नेत्यांच्या इच्छेनुसार आणि निर्देशानुसार सुरू असल्याचे लोबो म्हणाले.भाजप नेते या घटनांमधून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे लोबो म्हणाले. वास्को प्रकरणात मयेकर कुटुंब भाजप समर्थक आणि भगत कुटुंब काँग्रेस समर्थक असल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रकरण काँग्रेस-भाजपमधील भांडण असल्याचे दिसत आहे. जे चुकीचे आहे. असे आमोणकर म्हणाले. केपे येथे घडलेल्या घटनेबाबत काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, फटाके लावल्याबद्दल भाजप समर्थकाने एका व्यक्तीला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. भाजप समर्थकांनी सत्तेचा दुरुपयोग करण्यास सुरुवात केली आहे.