Nana Patole | कायदा सुव्यवस्था ढासळलेल्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची केंद्र सरकारला शिफारस करा

Nana Patole : महाराष्ट्रात गुंडाराज सुरु असून बंदुकीच्या धाकाने दबावतंत्र चालवले जात आहे, जाती-धर्मात भेद निर्माण केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, फुले, आंबेडकरांच्या विचाराला कलंक लावण्याचे पाप राज्यातील महायुती सरकार करत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) व सहकाऱ्यांवर पुण्यात हल्ला करण्यात आला. मागील दोन महिन्यातील घटना महाराष्ट्राची प्रतिष्ठा, नावलौकिक धुळीस मिळवणाऱ्या आहेत. राज्यपाल महोदयांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि राज्यात राष्ट्रपती राजवट (President’s rule) लावण्याची शिफारस केंद्र सरकारला (Central Govt) करावी, अशी मागणी केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.

राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad), प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe), काँग्रेसच्या SC विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे, AICC चे प्रवक्ते व महाराष्ट्र प्रभारी कम्युनिकेशन विभाग सुरेंद्र राजपूत, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड, आदी उपस्थित होते.

पत्रकारांना माहिती देताना नाना पटोले पुढे म्हणाले की, दोन महिन्यापूर्वीही राज्यपाल महोदय यांना भेटून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात अवगत केले होते, त्यानंतर राज्यपाल महोदयांनी पोलीस महासंचालकांना बोलावून सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते परंतु आता नवीन पोलीस महासंचालक आलेत आणि कायदा सुव्यवस्था आणखी ढासळली आहे. जनतेचा पोलीसांवरील विश्वास कमी झाल्याचे खुद्द पोलीस महासंचालक यांनीच मान्य केले आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून निर्घुण हत्या करण्यात आली, पुण्यात पत्रकार निखील वागळे यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत प्राणघातक हल्ला करण्यात आला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये दोन लोकांवर गोळीबार केला. २२ जानेवारी रोजी मीरा रोड येथे धार्मिक तणाव, सरकारने बुलडोझर चालवून गरिबांची घरे तोडली. जळगावातील भाजपचे नगरसेवक मोरे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. यवतमाळ शहरात भर दिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आली. लहान लहान मुलांकडे शस्त्रे सापडत आहेत, अवैध शस्त्रांचा मोठा साठा राज्यात येत आहे.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शिष्टमंडळाने राज्यपाल महोदयांची भेट घेऊन राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेची माहिती दिली. मुंबईत झालेले गोळीबार तसेच पुण्यात पत्रकार निखल वागळे, असिम सरोदे, विश्वंभर चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. वागळेंच्या कार्यक्रमाची पोलीसांना पूर्व सुचना दिली होती, त्यांनी परवानगीही मागितली होती पण त्यांना तासंतास रोखून धरले, जाताना त्यांच्यावर भाजपाच्या गुंडांनी जिवघेणा हल्ला केला, काही कार्यकर्त्यांनी बचाव केला नसता तर हा हल्ला प्राणघातक ठरला असता. फुले, शाहु, आंबेडकरांच्या राज्यात गुन्हेगारांना सरकारी संरक्षण मिळत आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण चालले आहे, याची माहिती राज्यपाल महोदय यांना दिली. तसेच ‘निर्भय बनो’च्या सभांना संरक्षण दिले पाहिजे, निखील वागळे, असिम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, ही मागणी केली आहे. राज्यात गुन्हेगारीला राजाश्रय मिळत आहे हे पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस राज्यपाल महोदय यांनी केंद्र सरकारला करावी ही मागणीही केली आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

Nikhil Wagle | पुण्यात निखील वागळेंवर हल्ला, भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकाराची गाडी फोडली

मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा असून सत्तासंघर्षातून महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे

Nana Patole | महाराष्ट्रात गुंडाराज, सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा