एका कुटुंबातून एकाच सदस्याला उमेदवारीच्या ठरावाचं काय झालं? चिदंबरम यांच्या उमेदवारीवर देशमुखांचा आक्षेप

नागपूर – राज्यसभा निवडणुकीमुळे (Rajya Sabha Election) सध्या राज्यातील वातावरण तापले असून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) असा जोरदार संघर्ष यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून एका बाजूला आपले उमेदवार विजयी होतील असा दावा करत असताना भाजपकडून देखील आपले उमेदवार सहज विजय मिळवतील असा दावा केला जात आहे.

माजी आमदार व काँग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshukh) यांनी एका कुटुंबातून एकाच सदस्याला उमेदवारीच्या ठरावाचा मुद्दा उपस्थित करत पी. चिदंबरम यांच्या उमेदवारीचा मुद्दा उपस्थित केलाय. तसेच उत्तर प्रदेशचे नेते इम्रान प्रतापगडी (Imran Pratapgadhi) यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर काँग्रेसने उमेदवारी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांवर अन्याय झाल्याची भावनाही देशमुख यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा देणार असला तरी काँग्रेसमध्ये राहून पक्षाचं काम करणार असल्याचं देशमुख यांनी नमूद केलं.

महाराष्ट्रात राज्यसभेसाठी अनेक सक्षम नेते असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करत बाहेरचा उमेदवार दिल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये खदखद वाढली आहे. बाहेरचा उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसमध्ये पहिला राजीनामा काँग्रेस प्रदेश महासचिव आशिष देशमुख देणार आहेत. भाजप सोडून, आमदारकी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करताना आशिष देशमुख यांना राज्यसभेचं आश्वासन देण्यात आलं होतं. खुद्द काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु ते पाळलं गेलं नाही, असा दावा आशिष देशमुख यांनी केला.

इम्रान प्रतापगढी जे स्वतः कव्वाल, शायर आहेत. शिर्डीमध्ये होणाऱ्या पक्षाच्या नव संकल्प शिबिरात त्यांचे कव्वालीचे कार्यक्रम ठेवा, असा खोचक सल्लाही आशिष देशमुख यांनी दिला. आपण महासचिव पदाचा राजीनामा देणार असला तरी पक्ष सोडणार नाही असंही त्यांनी जाहीर केलं.