राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सहकार्य केल्यास आमदारांना ‘हा’ उमेदवार देणार सफारी गाडी भेट देऊ

मुंबई – राज्यसभा निवडणुकीमुळे (Rajya Sabha Election) सध्या राज्यातील वातावरण तापले असून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) असा जोरदार संघर्ष यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून एका बाजूला आपले उमेदवार विजयी होतील असा दावा करत असताना भाजपकडून देखील आपले उमेदवार सहज विजय मिळवतील असा दावा केला जात आहे.

या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची चर्चा सुरु असताना उस्मानाबाद इथल्या एका राजकीय नेत्याने आमदारांना चक्क सफारी गाडीची ऑफर (Tata Safari Offer) दिली आहे. राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटूरे यांनी ही ऑफर दिली आहे. आज (31 मे) मुंबई इथे सकाळी अकरा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचाही दावा निटूरे यांनी यावेळी केला.

राज्यसभा निवडणुकीत आमदारांनी सहकार्य केल्यास त्यांना प्रत्येकी एक टाटा सफारी गाडी भेट म्हणून देऊ. हे कोणतेही आमिष नसून मतदारसंघात त्यांना काम करता यावं यासाठी भेट असणार आहे, अशी घोषणा अरुण निटुरे यांनी केली आहे. दरम्यान अरुण निटूरे यांनी 45 सफारी गाड्यांचे कोटेशन सुद्धा घेतले असून प्रती गाडी 26 लाखप्रमाणे 11 कोटी 81 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. निटुरे यांची ऑफर आमदार स्वीकारतील का? असा प्रश्न जरी असला तरी त्यांच्या या ऑफरची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

“सर्व आमदारांनी, सर्व पक्षांनी मला सहकार्य करावं. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकरी आमदारांनी मला मतदान करावं आण संसदेत पाठवावं. त्यांचे उपकार मी विसरणार नाही. मला जर संसदेत पाठवलं तर आमदारांना त्यांच्या मतदारसंघात काम करता यावं म्हणून सफारी गाडी देऊन मदत करु शकतो. हे लालच नाही तर कार्यकर्त्यांच्या सहभागातून त्यांना सहकार्य करु याची हमी देतो,” असं अरुण निटूरे यांनी म्हटलं.