संजय राऊतांच्या कुटुंबियांची वाईन व्यावसायिकांबरोबर पार्टनरशीप; सोमय्यांच्या आरोपांमुळे खळबळ

मुंबई – राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, या निर्णयामुळे राज्य सरकार टीकेची धनी बनले आहे. शिवरायांच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवले जात असल्याचे सांगत विरोधकांसह सामाजिक कार्यकर्ते आणि सुजाण नागरिक या निर्णयावर टीका करत आहेत. महत्वाचं म्हणजे सोशल मिडीयावर देखील सरकारच्या या निर्णयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयावरुन अनेकांनी सरकारला ट्रोल केलंय. मात्र, सरकारकडून या निर्णयाचे समर्थन करत फायदे सांगण्यात येत आहेत.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांच्या कुटुंबियांची वाईन (Wine) व्यावसायिकांबरोबर पार्टनरशीप असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, ” राऊतांच्या परिवाराने काही महिन्यांपूर्वी एका वाईन व्यावसायिकासोबत बिजनेस पार्टनरशीप केली. त्यांनी जाहीर करावं की त्यांची पत्नी, त्यांची कन्या यांच्या नावावर किती पार्टनरशीप आहे.”
नेमकं काय म्हणाले किरीट सोमय्या ?

मॅगपी ग्लोबल लिमिटेड या अशोक गर्ग यांच्या कंपनीसोबत राऊत यांची पार्टनरशीप आहे. त्यांचा हॉटेल, पब, क्लबस आणि काही ठिकाणी वाईन वितरित करण्याचा व्यवसाय आहे. 16 एप्रिल 2021 रोजी राऊत कुटुंबियांनी मॅगपीसोबत करारावर सह्या केल्या. विधिता आणि पूर्वशी या संजय राऊत यांच्या दोन्ही मुली या कंपनीत संचालक आहेत.

मॅगपी कंपनीचे मूळ नाव मादक प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. या कंपनीची उलाढाल वार्षिक 100 कोटींची आहे. कंपनीने 2 जानेवारी रोजी या कंपनीचा मुख्य व्यवसाय वाईन वितरित करण्याचा असल्याचे शासनाला कळवले.” त्यानंतर राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइन ठेवण्याचा निर्णय घेतला. मी थेट आरोप करतोय, पण उत्तर कोणी देत नाही.