श्रीलंकेला ७३ धावांवर लोळवत भारताने चुकता केला २२ वर्षांचा हिशोब, विश्वविक्रमही केला नावावर

तिरुवनंतपुरम- भारतीय संघाने (Team India) मायदेशातील श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका ३-०च्या फरकाने (ODI Series) जिंकत पुन्हा आपला दबदबा राखला. शुबमन गिल (Shubman Gill) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या शतकी खेळींच्या जोरावर भारतीय संघाने ३९० धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ ७३ धावांवरच सर्वबाद झाला आणि भारताने ३१७ धावांच्या मोठ्या अंतराने सामना व मालिकाही खिशात घातली. या सामना विजयासह भारतीय संघाने श्रीलंकेसोबतचा २२ वर्षे जुना हिशोबही बरोबर केला आहे.

२२ वर्षांपूर्वी २००० साली शारजाहमध्ये कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रीलंकेने भारतासमोर ३०० धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाठलाग करायला उतरलेला भारतीय संघ अवघ्या ५४ धावांवर गुंडाळला गेला होता. त्या सामन्यात रॉबिन सिंगने भारतीय संघासाठी सर्वाधिक ११ धावा केल्या होत्या. सौरव गांगुलीने ३, सचिन तेंडुलकर ५, युवराज सिंग ३ आणि इतर खेळाडूंनी १० पेक्षा कमी धावा केल्या होत्या. त्या सामन्यात सनथ जयसूर्याने श्रीलंकेसाठी १८९ धावांची शतकी खेळी खेळली होती. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चामिंडा वासने त्या सामन्यात ५ बळी घेतले होते. त्याच मुथय्या मुरलीधरनने ३ बळी घेतले होते.

भारतीय संघाने २२ वर्षांनंतर घेतला बदला
अर्थात आज भारतीय संघाने २२ वर्षांचा हिशोब चुकता केला आहे. तसेच भारतीय संघाने वनडेत पहिल्यांदा कोणत्या संघाला ३०० पेक्षा जास्त धावांनी पराभूत केले आहे. या विजयात युवा फलंदाज शुभमन गिल, अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शुभमन गिलने ९७ चेंडूत ११६ धावांची शानदार खेळी केली. तर रनमशीन विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक शतक झळकावले आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने १० षटकात ३२ धावा देत ४ बळी घेतले.