भविष्यात कोणत्याही क्षेत्रात जाण्याच्या योजना आखा, जर्मन भाषा तुमच्या समोरील पर्याय नक्की वाढवेल

पुणे : जर्मन भाषा (German Language) शिकल्याने तुमच्या कौशल्यांसोबतच गुणवत्तेमध्ये देखील वाढ होते. जर्मन भाषेचे ज्ञान हे भारतातच नव्हे तर परदेशातही नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी तुम्हाला उपलब्ध करून देत करियर उभारणीसाठी महत्त्वाचे ठरते. त्यामुळे तुम्ही नजीकच्या भविष्यात कोणत्याही क्षेत्रात जाण्याच्या योजना आखा, ही भाषा शिकल्याने तुमच्या समोरील पर्याय नक्की वाढतील असा विश्वास ग्योथं-इन्स्टिट्यूट मॅक्स म्यूलर भवनच्या संचालिका मरियम ब्रून्स यांनी आज व्यक्त केला.

आजपासून पुण्यातील ग्योथं-इन्स्टिट्यूट या ठिकाणी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील जर्मन भाषा शिकविणाऱ्या शिक्षकांच्या तीन दिवसीय परिषचे व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, त्याच्या उद्घाटन प्रसंगी ब्रून्स बोलत होत्या. पुणे व मुंबई येथील ग्योथं-इन्स्टिट्यूट मॅक्स म्यूलर भवन आणि इंडियन जर्मन टीचर्स असोसिएशन (InDaF) यांच्या संयुक्त विद्यमाने सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे व्हर्च्युअल सेशन २७ जानेवारी रोजी पार पडले त्यानंतर शनिवार व रविवार प्रत्यक्षरित्या परिषद संपन्न होत आहे. यामध्ये महाराष्ट्र व गुजरातमधील तब्बल १५० शिक्षकांनी आपला सहभाग नोंदविला.

‘लर्निंग जर्मन बाय डूईंग : विथ हेड, हँड अँड हार्ट’ अशी या परिषदेची संकल्पना असून मुंबईच्या ग्योथं-इन्स्टिट्यूटच्या सह संचालिका व भाषा विभाग प्रमुख ज्युलिया हबलाईन, मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या प्रमुख डॉ. विभा सुराना, इंडियन जर्मन टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्षा पुनीत कौर आदी यावेळी उपस्थित होते.

ग्योथं-इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीची जागतिक स्तरावरील महत्त्वाची अशी सांस्कृतिक संस्था म्हणून कार्यरत आहोत. आज जगभरातील १ लाखांहून अधिक शाळांमध्ये आम्ही विद्यार्थी व शिक्षकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देतो, असे मरियम ब्रून्स यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

या तीन दिवसीय परिषदेत तब्बल १८ विविध प्रकारच्या संवादात्मक कार्यशाळा संपन्न होणार असून शिक्षकांना यादरम्यान अनेक नवीन कल्पना, शिकविण्याच्या पद्धती, संवाद साधण्याच्या व  अध्यापनाची पद्धतींची माहिती होईल असे ज्युलिया हबलाईन यांनी सांगितले. जर्मन लेखिका मोनिका कॅंटीनी यांनी यावेळी आपल्या कादंबरीचे वैशिष्ट्यपूर्ण अभिवाचन सादर केले जे आजच्या दिवसाचे खास आकर्षण ठरले.