जो बायडन पुतीन यांना उद्धव ठाकरे कोण आहेत असं विचारत होते; संजय राऊत यांचा दावा

मुंबई- उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे रोज कोणत्या-ना-कोणत्या विषयावर भाष्य करत असतात, ज्याची भरपूर चर्चा होते. नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी उपहासात्मकपणे एक विधान केले आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि इंग्लडचे राजे प्रिन्स चार्ल्स या तिघांमध्ये चक्क माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची चर्चा झाली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. नागपुरात एका आजोयित कार्यक्रमात ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनाही शिंदे गटाच्या उठावाबद्दल उत्सुकता आहे.

यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, “रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि इंग्लडचे राजे प्रिन्स चार्ल्स या तिघांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल चर्चा झाली. उद्धव ठाकरे कोण आहेत? या माणसाची कमाल आहे. इतकी संकंट आली तरी ते हार मानत नाहीत असं ते म्हणत होते.”

“उद्या युद्धाची स्थिती निर्माण झाली तर उद्धव ठाकरेंचा सल्ला घ्यावा लागेल. जो बायडन पुतीन यांना उद्धव ठाकरेकोण आहेत असं विचारत होते. ते म्हणत होते मोदींना विचारा, त्यांनी अजून आपली भेट का करुन दिली नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीदेखील उद्धव ठाकरे कोण आहेत असं विचारत होते,” असे राऊत म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की “देशात युद्धाची स्थिती असून सगळं जग निराश आहे. अशावेळी उद्धव ठाकरे लढत आहेत. ही सुद्धा एक सेना, फौजच आहे ना. याचमुळे देशांचे प्रमुख लोक उद्धव ठाकरे कोण आहेत अशी विचारणा करत आहेत”. दरम्यान “क्लिंटनचा जमाना केव्हाच संपला हे कळलं पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदेंना टोलाही लगावला.