मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते?

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मंजुरी दिली आहे. यासंदर्भात स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष चौकशी समितीत आर्थिक गुन्हा शाखेचे सह पोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामामध्ये रुपये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेचा अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग) ने विशेष लेखापरिक्षा अहवालामध्ये निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुध्द गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन दिले होते.

दरम्यान, याच मुद्द्यावरून आता भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते? मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करता? किती स्टंप आणि बॅट तुमच्याकडे आहेत?

मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारच मानायला हवेत, त्यांनी चौकशी लावून तुमचे ‘कटकमिशनचे उद्योग मुंबईकरांसमोर उघडे पाडायचे ठरवलेय! तेव्हा तर दीड कोटी मुंबईकरसुद्धा तुम्हाला हिशेब विचारणार आहेत, तेवढे स्टंप आणि बॅट आहेत का तुमच्याकडे?आम्ही तर रोज विचारणार.. कोविड मध्ये ‘कफना’त पण ‘कट कमिशन कोणी खाल्ले?औषधांवरची मलाई कुणी खाल्ली?रस्त्यावरचे डांबर, नाल्यातील गाळ, शाळेतील मुलांच्या वस्तू यामध्ये कोट्यवधी कुणी लाटले?या स्टंप घेऊन आम्ही पण तयार आहोत!!’ असं शेलार यांनी म्हटले आहे.