विकास कामे करताना जाणीवपूर्वक त्रास, पण त्रास सहन करून कामे पूर्ण करणारच – शंकरराव गडाख

नेवासा : रस्ते व पुलाच्या कामामुळे दळणवळण वेगवान होणार आहे. आगामी दोन वर्षात नेवासा तालुक्यात रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असणार आहे.या सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी अधिकारी,ठेकेदार यांनी काळजी घ्यावी. या कामात कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

श्रीरामपूर-नेवासा हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा रस्ता, तसेच २२ किलोमीटर रस्ते व ४ कोटी रुपये खर्चाचे दोन मोठे पूल अशा सुमारे ६० कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ शुक्रवारी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्यासह ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.बेलपिंपळगाव, पाचेगाव,पुनतगाव,नेवासा बुद्रुक भालगाव,नेवासा शहर या मोठ्या गावांच्या दृष्टीने एकाच वेळेस रस्ता होत असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले यावेळी मंत्री गडाख पुढे म्हणाले भंडारदरा धरणाचे हक्काचे पाणी तेरा गावांना मिळविण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. त्या गावांवर अन्याय होणार नाही यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. घोगरगाव येथे वीज उपकेंद्र मंजूर करून घेतले आहे त्याचे लवकरात लवकर काम सुरू होईल. त्यामुळे चार ते पाच गावांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

श्रीरामपुर-नेवासा-शेवगाव मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी ४७ कोटी ५० लाख रुपये,नेवासा शहरातील कडू गल्ली, श्री मोहिनीराज मंदिर, नगरपंचायत चौक, जुन्या उषा टॉकीज परिसर येथील नगरपंचायत अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, डांबरीकरण, बंदिस्त गटार, पेव्हिंग ब्लॉक या विविध कामांसाठी ५ कोटी रुपये,जुन्या उषा टॉकीज शेजारील नेवासा हंडीनिमगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण २ कोटी ४० लाख रुपये, नेवासा हंडीनिमगाव रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी १ कोटी ६७ लाख रुपये,एसटी डेपो ते रानमळा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी १ कोटी रुपये नेवासा- खडका रस्त्यावरील काझीनाला पुलाचे बांधकाम कामासाठी २ कोटी ४९ लाख रुपये, अशा विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नेवासा, बेलपिंपळगाव घोगरगासहव परिसरातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकास कामे करताना जाणीवपूर्वक त्रास

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक खात्याचा निधी आणून तालुक्यातील गावागावांत विकास कामे पूर्ण क्षमतेने करण्यावर भर आहे. विकास कामे करताना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. तो त्रास सहन करून विकास कामे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. आपण सर्वांनी विकास कामांना साथ द्यावी. विकास कामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही मंत्री गडाख म्हटले आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शुभारंभ

साठ कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ मंत्री गडाख यांच्या हस्ते होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, अनेक ठिकाणी मंत्री गडाख यांनी उपस्थित असणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हे शुभारंभ केले. अनेक वर्षापासून या सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली होती. बेलपिंपळगाव ते नेवासा हा रस्ता २० वर्षानंतर होत आहे तो टप्प्याटप्प्याने न करता मंत्री गडाख यांनी एकाच वेळी मंजूर केल्याने समाधान व्यक्त होत आहे.