बाळासाहेबांची सावली मानले गेलेले चंपासिंह थापा शिंदे गटात का गेले? ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया…

Mumbai – स्वर्गीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सावली समजले जाणारे चंपासिंह थापा आणि मातोश्रीवर प्रदीर्घ काळ सेवा बजावलेले मोरेश्वर राजे यांनी आज टेम्भी नाक्यावरील अंबे मातेच्या आगमन मिरवणुकीत देवीच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करणाऱ्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार जी व्यक्ती पुढे घेऊन जात आहे अशा व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे यावेळी या दोघांनी सांगितले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हाप्रमुख शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना विस्तारक राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, अनेक नेते, कार्यकर्ते सोडून जात असताना ठाकरे गटाला अजूनही आत्मपरीक्षण करावं असं वाटत नसल्याचे दिसत आहे. कारण चंपासिंह थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया काहीशी तशीच आहे.

थापाचे मातोश्रीवर काही काम राहिलं नाही. तो बाळासाहेबांचा सेवक होता. तो गेला, का गेला? मला माहित नाही त्याला कोणी बोलवून घेतलं माहित नाही असं सावंत म्हणाले. त्याच्यावर काय अन्याय होता. त्याला काय राजकीय अभिलाषा होती का? बाळासाहेबांनी मुलासारखी सांभाळलेली ही माणसे आहेत. शिवसेनेतल्या अनेकांना फोन येत आहेत पैसे देतो या. विशेषत: शाखाप्रमुखांना अशा प्रकारच्या ऑफर दिल्या जात असल्याचा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे.