राम – राम गंगाराम हा चित्रपट पाहून पु. ल देशपांडे यांनी दादा कोंडके यांना शाबासकी का दिली ?

भावना संचेती – जेव्हा राजकारणी आणि एका कलाकाराची मैत्री (Friendship) असते तेव्हा त्या मैत्रीसाठी काय – काय करावं लागतं यांची अनेक उदाहरणे आहेत पण एक किस्सा मात्र आज देखील पुन्हा पुन्हा चर्चिला जातो. तो किस्सा अजरामर बनला तो पू. ल. देशपांडे यांच्यामुळे. आता तुम्ही विचार कराल की एक राजकारणी आणि दूसरा कलाकर कोण असेल बरं तर त्याचं उत्तर म्हणजे दादा कोंडके (Dada Kondke) आणि ते राजकारणी म्हणजे वसंत दादा (Vasantdada Patil) होय.

आता किस्सा असा आहे. गोष्ट 1975 सालची आहे. इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी नुकतीच आणीबाणी लादली होती. त्यासाठी त्यांनी 20 सूत्री एक कार्यक्रम देखील देशभरात राबविला होता. महाराष्ट्रात देखील वसंत दादा यांनी हा कार्यक्रम जोरदार राबवायचा असे ठरविले होते. वसंत दादा यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत होते. तेव्हा त्यांना आठवण झाली ती दादा कोंडके यांची, कारण दादा कोंडके आणि वसंत दादा एक चांगले मित्र होते. वसंत दादा यांनी दादा कोंडके यांना एक विनंती केली तुम्ही या 20 कलमावर एक सिनेमा बनवा. दादा कोंडके वसंत दादा यांना नाही देखील म्हणू शकत नव्हते. त्यांनी चित्रपट बनविण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी त्यांनी अशोक सराफ , भगवान दादा , उषा चव्हाण अशी तगडी स्टारकास्ट जमा केली.

दादा कोंडके हे सर्व फक्त मैत्री खातर करण्यासाठी तयार झाले होते . गंगाराम वीस कलमे हा चित्रपट बनवून तयार झाला. पण मधल्या काळात इंदिरा गांधी यांच्यावर खूप टीका सुरू झाली होती. सर्व वातावरण बदलून गेलं होतं. सर्वत्र आणीबाणीला तीव्र विरोध सुरू झाला होता. त्यामुळे आता या चिटपटांचा काही उपयोग नव्हता. दादा कोंडके यांनी यामध्ये खूप मोठी आर्थिक गुंतवणूक देखील केली होती. काय करावे काही सुचतच नव्हते. दादा कोंडके अगदी चिंतेत पडले सिनेमा तर 20 कलमी कार्यक्रमास प्रचार करणारा होता पण आता मात्र या कार्यक्रमास पूर्ण विरोध होत होता. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यात काहीच फायदा नव्हता.

तेव्हा दादा कोंडके यांना एका व्यक्तीचे नाव आठवलं . हा व्यक्तिचं आपल्याला नक्की मदत करू शकेल असा त्यांना विश्वास होता. तो व्यक्ति म्हणजे महाराष्ट्राचे विनोदी बादशाह पु. ल देशपांडे. त्यांना चित्रपट क्षेत्राची माहिती देखील होती. त्यामुळे ते नक्की काहीतरी मार्ग सुचवितील असे दादांना वाटले. ते मोठ्या आशेने स्क्रिप्ट घेऊन पू. ल. च्या घरी गेले. त्यावेळेस सुनीता बाई घरी होत्या. दादांनी सुनीता बाईना सर्व स्थिती संगितली. सुनीता बाईची उलट दादांची चांगलीच कानउघडणी केली. कारण पु. ल देशपांडे यांनी इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीस तीव्र विरोध केला होता. सुनीता बाई ओरडत असताना तेवढ्यात पु. ल देशपांडे घरी पोहचले. दादांनी त्याच्या हातात स्क्रिप्ट दिली आणि आता तुम्हीच मार्ग सुचवा असे संगितले.

पु. ल देशपांडे (Purushottam Laxman Deshpande) यांनी ती स्क्रिप्ट संपूर्ण वाचली.ते म्हणाले स्क्रीप्ट मध्ये अनेक बदल करावे लागतील. दादा कोंडके निराश मनाने घरी परतले, खूप पैसा गुंतला असल्यामुळे नवीन चित्रपट बनविण्याचे धाडस देखील होतं नव्हते. एक दिवस अचानक एक कल्पना सुचली आपण जे दाखवलं आहे त्याच्या विरोधी काही शॉट घालू आणि तो चित्रपट इंदिरा गांधी यांना विरोध करीत आहे असे दाखवू. जसे की बचत करा , दारूबंदी, नसबंदी हे मुद्दे इंदिरा गांधी याच्या विरोधात दाखविले. इंदिरा गांधी याचे त्या काळी गाय – वासरू हे चिन्ह होते त्याचा देखील वापर केला. जसे की गाय वासरू पैसे खात आहे असे दाखविले. काही नवीन शॉर्ट देखील शूट करून घातले अशा प्रकारे चित्रपटाला नवीन लुक दिला.

जेव्हा चित्रपट पु. ल देशपांडे व इतर दिग्गज व्यक्तींना दाखविला तेव्हा सर्वांनी त्यांना शाबासकी दिली. दादांनी चित्रपटांचे नाव ठेवले राम – राम गंगाराम. चित्रपट रिलीज झाला खूप चालला देखील. खूप गाजला. हे सर्व घडेपर्यत इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या होत्या. चित्रपट त्यांच्या विरोधी असून देखील तो थांबविण्यात आला नाही. हे देखील तितकेच महत्वाचे.