उत्पल पर्रिकरांचं तिकीट का कापलं?; फडणवीसांनी सांगितलं खरं कारण

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांकेलीम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर हे मडगावमधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. गोव्यातील विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार असून १० मार्चला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपच्या 40 पैकी 34 उमदेवारांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र, पणजीतून उत्पल पर्रिकरांऐवजी बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.  यावेळी फडणवीस यांना उत्पल पर्रिकरांच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आलं. त्यावर, पणजीतून विद्यमान आमदारालाच तिकीट देण्यात आलं आहे. उत्पल हे आमच्या परिवारातील आहेत. त्यांना दोन जागांची ऑफर दिली होती. त्यातील एक जागा त्यांनी नाकारली. दुसऱ्या जागेबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असं सांगतानाच पर्रिकरांच्या कुटुंबाला भाजपने नेहमीच सन्मान दिला आहे, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान,  भाजपने राणे दाम्पत्य आणि मोन्सेरात दाम्पत्याला तिकीट जाहीर केले आहे. यानुसार भाजपने वाळपई मतदारसंघातून विश्वजीत प्रतापसिंग राणे यांना तर पर्ये मतदारसंघातून त्यांची पत्नी दिव्या विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांना तिकीट देण्यात आले आहे. त्याचसोबतच पणजीतून बाबूश मोन्सेरात (Atanasio Monserrate) आणि ताळगावमधून त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.