‘महाराष्ट्रात वाईन म्हणजे दारू नाही’, आरोह वेलणकरने अजित पवारांना घेतलं फैलावर

पुणे : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.

राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्यादृष्टीनं राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकारनं पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे. दरम्यान ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर आता विरोधी पक्ष असलेला भाजप कमालीचा आक्रमक झाला आहे. तर हा निर्णय मागे घ्यावा असा दबाव विरोधीपक्षांकडून महाविकास आघाडी सरकारवर केला जात आहे.

याउलट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. ‘वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळं तयार करतात. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार होते. अशी अनेक फळं आहेत. आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचं प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण काहींनी जाणीवपूर्वक मद्य राष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्त्व दिलं आहे’, असं अजित पवार म्हणाले आहेत.

त्यानंतर अभिनेता आरोह वेलणकर याने अजित पवारांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘आता दारू पिऊन गाडी चालवताना पकडलं की बोला वाईन प्यायलोय महाराष्ट्रात वाईन म्हणजे दारू नाही. हा पुरोगामी विचार समाजात पेरल्याबद्दल मविआ नेत्यांचे आभार. जे काय करायचय, नियम तोडायचेत आता वाईन पिऊन करा रे पोरांनो, काही होणार नाही बघा’. असा सणसणीत टोला आरोह वेलणकर याने अजित पवार आणि महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.