कॉंग्रेसमधून गळती सुरूच; ‘या’ आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश

चंडीगड – पुढील वर्षी पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार फतेह सिंग बाजवा यांनी मंगळवारी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.

कादियानचे आमदार बाजवा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रताप सिंह बाजवा यांचे बंधू आहेत. बाजवा यांच्याशिवाय पंजाबमधील काँग्रेसचे विद्यमान आमदार बलविंदर सिंग लड्डी यांनीही मंगळवारी BJP पक्षात प्रवेश केला. निवडणुकीपूर्वी या दोन आमदारांनी पक्ष सोडल्यामुळे पंजाब काँग्रेसमधील अस्वस्थता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग धिंडसा यांनी एक दिवसापूर्वी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतली तेव्हा हे नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. या बैठकीनंतर भाजप आणि या दोन नेत्यांच्या पक्षांमध्ये युतीची औपचारिक घोषणा करण्यात आली.

पक्षात सामील झाल्यानंतर 44 वर्षीय माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची ‘सबका साथ सबका विकास’ ही विचारधारा योग्य आहे. मला पंजाब आणि देशातील जनतेची सेवा करायची आहे, त्यासाठी भाजपपेक्षा चांगला पक्ष असूच शकत नाही, असे मला वाटते.

2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 77 जागांवर पूर्ण बहुमत मिळवले आणि 10 वर्षानंतर शिरोमणी अकाली दल-भाजप सरकारला सत्तेतून बाहेर काढले. त्याच वेळी, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी (AAP) 117 सदस्यांच्या पंजाब विधानसभेत 20 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला. शिरोमणी अकाली दलाने 15 जागा जिंकल्या, तर भाजपला फक्त 3 जागा मिळाल्या.