श्वास तपासण्याच्या बहाण्याने स्तनाला आणि पोटाला स्पर्श केला, महिला कुस्तीपटूंचे ब्रिजभूषण यांच्यावर आरोप

नवी दिल्ली- रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. ब्रिजभूषण यांच्यावर 7 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळ-मानसिक छळाचे आरोप केले आहेत. आता दोन महिला कुस्तीपटूंनी तक्रारीत काय म्हटले आहे? त्याचा अहवाल समोर आला आहे.

21 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या तक्रारींमध्ये किमान आठ घटनांचा उल्लेख आहे. यामध्ये टूर्नामेंट, वॉर्म अप आणि अगदी नवी दिल्लीतील WFI कार्यालयात लैंगिक छळ आणि गैरवर्तन (विनयभंग, अयोग्य स्पर्श आणि शारीरिक संपर्कासह) अनेक घटनांचा समावेश आहे.

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात नव्याने तक्रार दाखल करणाऱ्या दोन महिला कुस्तीपटूंनी म्हटले आहे की, ब्रिजभूषणने दोन्ही महिला कुस्तीपटूंना अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता.

तक्रारदार कुस्तीपटूंनी म्हटले आहे की, ब्रिजभूषण सिंह यांनी श्वास तपासण्याच्या बहाण्याने त्यांच्या पोटाला आणि स्तनाला स्पर्श केला. दोन महिला कुस्तीपटूंनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ब्रिजभूषण सिंगने त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले आहे.