जग्गी वासुदेवांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान? आव्हाडांनी थेट व्हिडीओ ट्वीट केला आणि म्हणाले…

Jitendra Awhad on Jaggi Vasudev : सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक अँनिमेशन कथा प्रसारित केली, ज्यात संत रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे दाखवण्यात आले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आक्षेप घेत जग्गी वासुदेव यांच्याविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.तसेच राज्य सरकारने याबाबतीत कडक कायदेशीर कारवाई करावी अन्यथा जनक्षोभ उसळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?“जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवाजीराजांविषयी एक खोटी कथा प्रसारित केली आहे. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. ‘रामदास स्वामींना भिक्षा मागताना बघून शिवाजी महाराजांनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला त्यांच्या चरणी अर्पण केले. रामदास स्वामींच्या आदेशानेच शिवाजी महाराजांनी राज्य सोडून हाती कटोरा घेत भिक्षा मागितली’, असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जातो आहे”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.