मराठी चित्रपटसृष्टीतील ‘या’  ज्येष्ठ अभिनेत्रीने केला राष्ट्रवादीत प्रवेश…

 मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी (Asavari Joshi) व स्वागता शहा (Swagata Shah) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षप्रवेश करणार्‍यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले.

कोरोनाच्या संकटातून पूर्वपदावर महाराष्ट्राला आणले आहे. तरीही लोकांनी मास्क लावून काळजी घ्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रदेश कार्यालयात केले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र पुढे नेण्याचे काम पवारसाहेब करत आहेत असेही अजित पवार म्हणाले.

प्रवेश द्यायचा आणि संपर्क ठेवायचा नाही असं होता कामा नये. शिवाय पक्षाला बाधा निर्माण होईल असे काम करु नये अशी सूचना अजित पवार यांनी व्यक्त केली. आमदार सुनील शेळके यांच्यासारखा उमदा कार्यकर्ता आम्हाला मावळमध्ये भेटला. लोकांनी आपली जबाबदारी पार पाडली आता आमची कामे करण्याची जबाबदारी आहे असेही अजित पवार म्हणाले.

समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनाच्या संकटात आपण खूप भोगलं आहे आता कुठे सावरण्याचा प्रयत्न महाराष्ट्र करत आहे अशावेळी काही राजकीय पक्ष कोणताही विषय काढून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे असेही अजित पवार म्हणाले.

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप इतके दिवस चालवण्याची गरज नव्हती. पगार वेळेवर होईल असा शब्द कर्मचाऱ्यांना दिला होता. मात्र कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला त्याला काही कर्मचारी बळी पडत असून राज्याच्या हिताच्यादृष्टीने महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यातील तीन हजार कलाकारांना आपण राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून मदत दिली आहे. शिवाय तमाशा कलावंतांनाही मदत दिली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.यावेळी मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी, स्वागता शहा यांच्यासह मावळ तालुक्यातील भाजपचे अमोल केदारी, शिवली सरपंच बाळासाहेब आडकर, माजी पंचायत समिती सदस्य दिनकर आडकर, अरुण आडकर, कॉंग्रेसचे प्रवक्ते फिरोज शेख, रायगड सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष नंदू भोपी, कामगार नेते भारत चौधरी, नितळम उपसरपंच भानुदास म्हात्रे, अशोक भोपी, संदीप भोपी, प्रतिक चौधरी, वृषभ चौधरी, ज्ञानदेव म्हात्रे, भिमसेन पाटील, रंजित तांबडे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.आमदार सुनिल शेळके, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.