काल पद्म पुरस्कार अन् आज गुन्हा दाखल… सुंदर पिचाईंच्या अडचणी वाढल्या

मुंबई – काल गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना यावर्षीचा देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण जाहीर झाला आहे. दुसरीकडे, सुंदर पिचाई आणि गुगलच्या इतर 5 लोकांविरुद्ध आज मुंबईत कॉपीराइट कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

बॉलिवूडमध्ये सनी देओल आणि अक्षय कुमार यांच्यासोबत चित्रपट बनवणारे निर्माता-दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी कॉपीराइट प्रकरणी गुगलचे सीईओ पिचाई यांच्यासह गुगलच्या सहा अधिका-यांविरोधात मुंबईत एफआयआर दाखल केला आहे. केले आहे.सुनील दर्शनने 25 जानेवारी रोजी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, यूट्यूब दीर्घ काळापासून त्याच्या चित्रपट आणि संगीताद्वारे कोट्यवधी रुपये कमवत आहे आणि यासाठी तो गेल्या 11 वर्षांपासून संघर्ष करत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2017 मध्ये आलेल्या ‘एक हसीना थी एक दीवाना था’ या सिनेमात शेवटचे निर्माता-दिग्दर्शक म्हणून काम केलेले सुनील दर्शन यांनी याबद्दल सांगितले आहे – मी गेल्या 11 वर्षांपासून हे युद्ध लढत होतो. मी सरकारकडून गुगल आणि यूट्यूबच्या उच्च अधिकाऱ्यांना अनेक पत्रे, विनंत्या लिहिल्या, पण कोणीही ऐकले नाही. कोणीही उत्तर द्यायला तयार नव्हते. विशेष म्हणजे माझी तक्रार नोंदवायलाही कोणी तयार नव्हते. त्यानंतर मी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि कोर्टाच्या आदेशानंतरच मी एफआयआर करू शकलो.