पाच विकेट्स घेणाऱ्या आकाश मधवालची टीम इंडियात होणार एन्ट्री? कर्णधार रोहितने दिले संकेत

आयपीएल 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव केला. यासह लखनऊचे अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. गेल्या मोसमातही लखनऊला प्ले-ऑफ फेरीतच हार पत्करावी लागली होती. मुंबई इंडियन्सच्या या विजयात उत्तराखंडचा 29 वर्षीय गोलंदाज आकाश मधवालचे (Akash Madhwal) महत्त्वाचे योगदान होते. त्याने अवघ्या 3.3 षटकांत पाच धावांत पाच गडी बाद करत मुंबई इंडियन्सचा विजय निश्चित केला.

आकाश मधवालच्या या उत्कृष्ट गोलंदाजीने सर्वांनाच चकित केले आहे आणि अनेक दिग्गजांचेही लक्ष वेधून घेतले आहे. त्याची गोलंदाजी पाहून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही (Rohit Sharma) त्याच्या टीम इंडियातील प्रवेशाचे मोठे संकेत दिले आहेत.

सामन्यानंतर सादरीकरणाच्या कार्यक्रमात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आकाश मधवालच्या गोलंदाजीवर मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला की, लोकांना आमच्याकडून आम्ही नेहमी जे करतो, त्याचीच अपेक्षा नसते. आम्ही नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची त्यांना अपेक्षा असते. आणि आम्ही त्यात यशस्वी झालो.

आकाशच्या गोलंदाजीचे कौतुक करताना रोहित म्हणाला, “तो (आकाश) गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सचा सहाय्यक गोलंदाज म्हणून संघात सामील झाला होता. जोफ्रा गेल्यानंतर, मला खात्री होती की आमच्या संघाला आवश्यक असलेली कौशल्ये त्याच्याकडे आहेत. तो गोलंदाजी फळीसाठी उपयोगी पडेल. गेल्या काही वर्षांत मी मुंबई इंडियन्समधून टीम इंडियात आलेले अनेक खेळाडू पाहिले आहेत. युवा खेळाडूंना संघातील सदस्यांसारखे वाटणे खूप महत्त्वाचे आहे. संघातील त्याच्या भूमिका, त्याला संघासाठी काय करायचे आहे आणि तुम्हाला काय हवे आहे याबद्दल तो अगदी स्पष्ट आहे.”