भारतातील 11 कोटी ग्रामीण कुटुंबांना आता नळाद्वारे पाणी उपलब्ध

नवी दिल्ली – भारत आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, आज देशातील 11 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाने पाणी उपलब्ध झाले आहे. भारतातील 123 जिल्हे आणि 1.53 लाखाहून अधिक गावांची ‘हर घर जल’ मोहिमेत नोंद झाली आहे, याचाच अर्थ या प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. मागील वर्षांमध्ये अनेक अडथळे येऊनही, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी प्रत्येक ग्रामीण घरात नळाचे पाणी सुनिश्चित करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.

वर्ष 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाने पाणी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी जल जीवन मिशनची घोषणा केली होती. वर्ष 2019 च्या या घोषणेच्या शुभारंभाच्या वेळी, 19.35 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी केवळ 3.23 कोटी कुटुंबांना (16.72%) नळाच्या पाण्याची सोय होती. आयुष्य बदलून टाकणाऱ्या या मोहिमेच्या केवळ तीन वर्षांच्या अल्प कालावधीत, आजतागायत 11 कोटींहून अधिक (56.84%) ग्रामीण कुटुंबांना त्यांच्या घरात नळाने पाणीपुरवठा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन अंतर्गत 11 कोटी नळजोडण्यांचे उद्दिष्ट गाठल्याबद्दल प्रशंसा केली आहे.पंतप्रधान मोदींनी या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन केले आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष स्थानावर काम करणाऱ्यांचे कौतुक केले आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनीही या यशाबद्दल ट्विट करत म्हटले आहे की, “आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दृष्टिकोनातून , मंत्रालयाने जलजीवन मिशनसाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांचा केलेला अथक पाठपुरावा आणि प्रत्यक्ष प्रकल्पस्थानी आमच्या लोकांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हा मोठा टप्पा गाठणे शक्य झाले आहे.” केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, “जीवनाचे हे अमृत त्यांच्या दारात पोहोचल्याने 11 कोटी घरांना आता आरोग्य आणि सुदृढतेची खात्री मिळाली आहे.”