पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 4 चिनी अभियंत्यांसह 13 ठार

terrorist attack in Pakistan : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये रविवारी (१३ ऑगस्ट) दुपारी चिनी अभियंत्यांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४ चिनी नागरिकांसह अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. मात्र, आतापर्यंत पाकिस्तान सरकार आणि लष्कराच्या वतीने मृत्यू झालेल्यांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. बलुच लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

ग्वादरमध्ये आजच्या (13 ऑगस्ट) झालेल्या हल्ल्यात 4 चिनी नागरिक आणि 9 पाकिस्तानी लष्करी जवानांसह 13 जण ठार झाल्याचा या दहशतवादी संघटनेचा दावा आहे. बीएलए मजीद ब्रिगेडच्या दोन ‘फिदाईन’नी आज ग्वादरमध्ये चिनी अभियंत्यांच्या ताफ्याला लक्ष्य केले, असे बीएलएचे प्रवक्ते जियांद बलोच यांनी सांगितले, अशी बातमी असोसिएटेड प्रेसने दिली.

द बलुचिस्तान पोस्टच्या वृत्तानुसार, चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर सकाळी 9.30 वाजता हल्ला झाला आणि सुमारे दोन तास जोरदार गोळीबार झाला. या प्रकरणी पाकिस्तानकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नसले तरी लष्कराने निश्चितपणे दोन दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे.

दरम्यान,  ग्वादर हे ठिकाण आहे जिथे चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे. दोन वर्षांपूर्वीही येथे चिनी अभियंत्यांवर फिदाईन हल्ला झाला होता. त्यानंतर 9 अभियंते मारले गेले.