युक्रेनमधून 9 बांगलादेशींची सुटका केल्याबद्दल शेख हसीना यांनी मोदींचे मानले आभार 

नवी दिल्ली : युद्धग्रस्त युक्रेनमधून आपल्या देशातील नऊ नागरिकांना बाहेर काढल्याबद्दल बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बुधवारी आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. एका सरकारी सूत्राने वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ‘ऑपरेशन गंगा’चा एक भाग म्हणून युक्रेनमधून नऊ बांगलादेशी नागरिकांची सुटका केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

रशियाच्या हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनच्या सर्व शहरांमध्ये अडकलेल्या नेपाळ, ट्युनिशिया आणि पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांचीही सुटका करण्यात आली आहे. जगातील अनेक देशांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना मदत करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. मात्र, युद्धग्रस्त युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन गंगा’बद्दल भारताचे कौतुक केले जात आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, युक्रेनच्या युद्धग्रस्त सुमी शहरातून भारतीय विद्यार्थ्यांचे स्थलांतर सुरू झाले असून विद्यार्थी बसेसमधून पोल्टावा शहराकडे रवाना झाले आहेत. पुरी यांनी पत्रकारांना सांगितले की, मी कंट्रोल रूममध्ये बोललो, काल रात्रीपर्यंत सुमीमध्ये 694 भारतीय विद्यार्थी होते. हे सर्वजण आज बसने पोल्टावाला रवाना झाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि पूर्व युरोपीय देशावर रशियाच्या हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्या सुमीपासून भारतीय विद्यार्थ्यांना वाचवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. भारताने आतापर्यंत युद्धग्रस्त युक्रेनमधून आपल्या 17,100 हून अधिक नागरिकांना मायदेशी परत आणले आहे.