ठाकरे सरकार पाडण्यासाठी शिंदे-फडणवीस आणि माझ्यात २ वर्षांत १५० बैठका- तानाजी सावंत

धाराशिव- शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून आपण कसे प्रयत्न केले?, याबद्दल गौप्यस्फोट केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ‘पुढारी’ने याबाबत वृत्त दिले आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना युतीला पाठींबा दिला, पण शरद पवारांनी (Sharad Pawar) मीठाचा खडा टाकला आणि आणि पक्षप्रमुख ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्येही मला स्थान देण्यात आले नाही. म्हणूनच मी मातोश्रीवर जाऊन ‘त्यांना’ सांगितले की मी पुन्हा मातोश्रीच्या पायऱ्याही चढणार नाही. ३० डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मला त्यापासूनही दूर ठेवण्यात आले. त्यामुळे मी संतप्त झालो आणि फडणवीसांच्या आदेशाने मी ३ जानेवारीला बंड केले आणि भाजपच्या मदतीने उस्मानाबाद जिल्हा परिषदेत सत्तेवर आलो.

त्यानंतर सलग दोन वर्षे हे सरकार पाडण्यासाठी काम केले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी सातत्याने बैठका झाल्या. सुमारे १०० ते १५० बैठका झाल्या. यावेळी आम्ही विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांचे कौन्सेलिंग करत होतो, असेही त्यांनी पुढे म्हटले.

मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरुन ठाकरे सरकार पाडण्याचे कारस्थान दोन वर्षांपासून सुरू होते, हे स्पष्ट झाले आहे. तसेच हे सरकार पाडण्यात आपला हात नव्हता असे फडणवीस (Devendra Fadnavis) सांगत असले तरी त्यांचे प्रयत्नही उघड झाले आहेत.