इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याचं सांगत व्यापाऱ्याला घातला 80 लाखाचा गंडा

कोल्हापूर – आयकर अधिकारी असल्याचे भासवून व्यापाऱ्याचे 80 लाख रुपये लुटणाऱ्या सात संशयीतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख 17 लाख 60 हजार रुपये आणि वस्तू असा 19 लाख 28 हजार 500 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला.

या गुन्ह्यातील एक संशयित अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सुकुमार उर्फ बबलू हंबीरराव चव्हाण वय 36 रा.उभी गल्ली लक्ष्मी मंदिराजवळ निगवे दुमाला तालुका करवीर, संजय आप्पासो शिंदे, 40 रा.गाव चावडीजवळ शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, राहुल बाबुराव मोरबाळे 47 रा. अंबाबाई मंदिरात शेजारी, जय भवानी गल्ली, हुपरी ता. हातकणंगले, राहुल अशोक कांबळे, 27 मेन रोड, पोपट सर्जेराव चव्हाण वय 32 दोघे रा. लक्ष्मी मंदिराजवळ, निगवे तुम्हाला तालुका करवीर, जगतमान बहादूर सावंत, रमेश करण सोनार वय 22, दोघे,रा. गांधीनगर, या. करवीर ,मुळगाव लमकी, कैलाली, बहोनिया नेपाळ. अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत यामधील नरसी दमू राहणार सांगली हा संशयित अद्याप ही फरार आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय गोरले यांनी पत्रकार परिषदेची माहिती दिली.

धनाजी आनंदा मगर रा. नागाव, ता. वाळवा जिल्हा सांगली हे व्यापारी असून ते १९ ऑक्टोबर रोजी गांधीनगर येथील व्यवसायातील ८० लाख १३ हजार रुपये इतकी रक्कम बॅग मध्ये भरून ज्युपिटर मोपेड वरून घेऊन जात होते. गांधीनगर येथून दोन मोटरसायकल वरून चार संशयितांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांना कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहत येथील सिग्नल जवळ अडवले. चौघांनी आपण आयकर खात्याचे अधिकारी असल्याचे सांगितले. तुमच्याकडे किती रक्कम आहे अशी विचारणा धनाजी मगर यांच्याकडे केली. त्यानंतर मगर यांना घेऊन ते शिरोली एमआयडीसी च्या दिशेने गेले. मगर यांच्या हातातली पैशाची बॅग हिसकावून संशयितांनी मगर यांना सांगली फाट्यावर सोडून दिले. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना तपासाचे आदेश दिले. तपास करत असताना पोलीस निरीक्षक गोर्ले यांना सुकुमार उर्फ बबलू चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी हा गुन्हा केला आहे, अशी माहिती मिळाली.त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, विनायक सपाटे, पोलीस अंमलदार अमर कोळेकर ,सागर कांडगावे, सुनील कवळेकर, वसंत पिंगळे ,संदीप कुंभार, नितीन चोथे, ओंकार परब, तुकाराम राजघरे आणि अजित वाडेकर यांनी संभाजीनगर एसटी स्टँड परिसरात सात संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख 17 लाख 60 हजार रुपये, तीन मोटरसायकल, मोबाईल साहित्य जप्त करण्यात आले आहे.