“तुमचा मेंदू सडलाय, सनी लियोनीला…”, WTC फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर बॉलिवूड अभिनेता संतापला

भारतीय संघ (Team India) हा जगातील क्रमांक एकचा क्रिकेट संघ मानला जातो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जागतिक क्रिकेटवर राज्य करत आहे. क्रिकेटचा अर्थ भारत मानला जातो. मात्र 2013 पासून टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. 4 वेळा विजेतेपदापर्यंत पोहोचूनही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला हे दुर्दैवी आहे.

भारताने 2013 पासून आयसीसीची कोणतीच ट्रॉफी जिंकलेली नाही. नुकत्याच झालेल्या WTC Final मध्ये भारताला हा दशकभराचा दुष्काळ संपवण्याची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला अन् भारताचे स्वप्न धुळीस मिळाले. यानंतर चाहत्यांसह आजी -माजी क्रिकेटपटू भारतीय संघावर टीका करत आहेत. अशातच आता बॉलिवूड अभिनेता केआरकेने सनी लियोनीचा उल्लेख करत टीका केली आहे.

सनी लियोनीच्या (Sunny Leone) एका जाहिरातीचा फोटो शेअर करत केआरकेने टीका केली आहे. “तुम्ही तुमच्या भारतीय संघाची जाहिरात करण्यासाठी पॉर्न स्टार सनी लियोनीला पैसे देत असाल तर तुम्ही कधीही ट्रॉफी जिंकू शकणार नाही. आणि तुमचा मेंदू सडला आहे, याचाच हा पुरावा आहे,” असं केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

केआरके म्हणजेच कमाल आर खानच्या या ट्वीटवर अनेक ट्विटर युजर्सनी कमेंट केल्या आहेत. काहींनी केआरकेचं म्हणणं बरोबर असल्याचं म्हटलं आहे. तर, अनेकांनी केआरकेच्या या ट्वीटवर नाराजी व्यक्त केली आहे.