मोदींच्या अनेक गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या, पण आपलं कोण ऐकणार ही त्यांची व्यथा होती – वागळे

Pune – पुण्याचे लोकप्रिय खासदार गिरीश बापट (Girish Bapat) याचं आज निधन झाले असून नुकतेच यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बापट यांना अखेरचा निरोप देताना पुण्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांना, तसंच उपस्थित असलेल्या नेत्यांना अश्रू अनावर झाले होते. गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे. राज्याच्या राजकारणातील गेल्या पाच दशकातला मोठा जनाधार असलेला भाजपाचा दमदार नेता हरपला.

खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आज सकाळी पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. पुणे शहर व पुणे जिल्ह्यात भाजपचे मजबुत व ताकदवान संघटन उभे करणारे असे व्यक्तिमत्व म्हणून ते कायम स्मरणात राहतील.

दरम्यान, बापट यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. जेष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांनी देखील आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त करताना एक लक्ष्यवेधी बाब समोर आणली आहे. निते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, गिरीष बापट गेले. वाजपेयी-अडवाणी पिढीचा प्रतिनिधी असलेला, एक निर्विष भाजप नेता हरपला. ते दिलखुलास तर होतेच, पण राजकीय मतभेदांचं रुपांतर शत्रुत्वात होऊ न देण्याचं भान त्यांनी नेहमीच ठेवलं. त्यांनी विधानभेच्या ५ आणि लोकसभेची १ निवडणूक सलग जिंकली, पण विरोधकांमध्येही मित्र जोडले.

आजचा सवालसाठी स्टुडिओत आले की ते मनमुराद हसवत. मोदींच्या अनेक गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या, पण आपलं कोण ऐकणार ही त्यांची व्यथा होती. कसब्याच्या निवडणुकीत भाजपने त्यांचे हाल करायला नको होते. बापट यांना आदरांजली. असं वागळे यांनी म्हटले आहे.