जिलेबी वाटा..! ‘कपूर फॅमिली’च्या घरी लक्ष्मीचे आगमन, आलिया-रणवीरला झाली मुलगी

मुंबई: मनोरंजनसृष्टीतून रविवारी (०६ नोव्हेंबर) सर्वात मोठी बातमी पुढे आली आहे. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट-कपूर (Alia Bhatt) आणि रणवीर कपूर (Ranbir Kapoor) यांना रविवारी कन्यारत्न प्राप्ती (Baby Girl) झाली आहे. रविवारी सकाळी तिला मुंबईच्या एचएन रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आता दुपारी आलियाने इंस्टाग्राम पोस्ट करत आपण आई बनल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. यानंतर बॉलीवूड सेलिब्रिटींसह आलिया आणि रणवीरचे चाहते या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

आलिया भट्टने ही आनंदाची बातमी इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने एक पोस्टर शेअर केला आहे, ज्यामध्ये सिंह-सिंहिणी आणि शावक यांचा फोटो आहे. यासोबत तिने लिहिले आहे, ‘आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी. आमची गोंडस मुलगी या जगात आली आहे. ती हुबेहुब बाहुलीसारखी दिसते. मी आणि रणवीर पालक बनल्याचा आम्हाला आनंद आहे.’