नाशिकमध्ये सिन्नर-शिर्डी मार्गावर खासगी बस-ट्रकची समोरासमोर धडक, १० प्रवाशांचा मृत्यू

Sinnar Shirdi Accident : नाशिकमधील सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघाताची दुर्घटना (Accident News) घडलीय. या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू, तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. खासगी आराम बस (Bus Accident) आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन ही अपघाताची दुर्घटना घडली. आज (13 जानेवारी 2023) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.सिन्नर-शिर्डी महामार्गावरील वावी पाथरे गावाजवळ हा अपघात झाला.

दरम्यान, खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी, नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.