औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळवले ? 

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा (Dhananjay Mahadik) विजय झाला आहे. विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवानंतर मनसेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) ट्विट करत म्हणाले की, औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळवले? सेनाप्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकाचा बळी पण दिला. सेना लढाईतही हरली व तहात पण हरली, अशी टीका राजू पाटील यांनी केली आहे. दरम्यान, मनसेने राज्यसभेच्या निवडणूकीत भाजपाला मतदान करणार असल्याचं जाहीर केलं होतं.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी देखील मत व्यक्त केलं. राज्यसभा निवडणुकाचा निकाल हा धक्का बसणारा नाही. महाविकास आघाडीतील तिनही पक्षांनी जो मतांचा कोटा ठरवला होता त्याची संख्या पाहिली तर तिन्ही पक्षांच्या कोटा मध्ये फरक पडलेला नाही. आमच्यातील कोणीही फुटलेलं नाही. प्रफुल्ल पटेल यांना एक मत जास्त मिळालं ते एका अपक्ष आमदाराचं होतं. त्या अपक्ष आमदाराने मला सांगूनच तसं केलं होतं. पण भाजपाने अपक्षांची जी मोट बांधण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी झाले आणि त्याचाच फरक पडला. चमत्कार झाला हे मान्य केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी विविध मार्गाने माणसं आपलीशी करण्याच्या गोष्टीमुळे त्यांना यश आलं आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी राज्यसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली.