Dhoni vs Jadeja: धोनी आणि जडेजात वादाची ठिणगी? प्लेऑफपूर्वी सीएसकेच्या गोटात फूट?

Dhoni vs Jadeja : एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (DC vs CSK) 77 धावांनी पराभव केला. या विजयासह सीएसकेने मेगा लीगच्या प्लेऑफमध्ये विक्रमी बाराव्यांदा प्रवेश केला आहे. एकीकडे सीएसके प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे तर दुसरीकडे एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

आयपीएल 2022 मध्येही या दोन दिग्गजांमध्ये कर्णधारपदावरून वाद निर्माण झाला होता, ज्यानंतर जडेजा पुढील हंगामात दुसर्‍या फ्रँचायझीसाठी खेळताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात होती.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान धोनी आणि जडेजा (Dhoni vs Jadeja) काही विषयावर गंभीरपणे बोलतांना दिसले आणि यादरम्यान स्टार ऑलराऊंडर जड्डू थोडासा रागात दिसला. मात्र, या दोन्ही खेळाडूंमध्ये काय चर्चा झाली, याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. पण सामन्यानंतरही धोनी आणि जडेजा एकमेकांशी गंभीर संवाद साधताना दिसले. काही चाहत्यांचे म्हणणे आहे की कदाचित धोनी जडेजाशी त्याच्या गोलंदाजीबद्दल बोलत असेल कारण तो दिल्लीविरुद्ध खूप महागडा ठरला होता.

एकीकडे दोघांमधील वादाच्या चर्चा सुरू असतानाच रविवारी (21 मे) जडेजाने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक गूढ पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये असे लिहिलेले आहे की, “कर्म निश्चितपणे पुन्हा तुमच्याकडे येते, उशिरा का होईना पण नक्की भेटू.” यावर पोस्टवर कमेंट करताना जडेजाने ‘नक्कीच’ असे लिहिले आहे.

जडेजाची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. चाहते या पोस्टचा धोनीसोबतच्या वादाशी संबंध जोडत आहेत. जडेजाच्या या पोस्टवर त्याची पत्नी रिवाबानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘स्वतःचा मार्ग स्वत: निवड’ असे तिने लिहिले आहे.