मिंधेगटाच्या गद्दारीची तुलना शिवरायांच्या पराक्रमाशी होऊच शकत नाही – आदित्य ठाकरे  

Mumbai – काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा जाणता राजा असा उल्लेख करत थेट छत्रपती शिवरायांशी काहींनी तुलना केली होती. यानंतर आता पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे. दरम्यान, लोढा यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधीपक्ष आता पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर टीका करू लागला आहे. दोन्ही बाजूंनी याबाबत प्रतिक्रिया येत आहेत.

शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया देताना शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, ज्यांना महाराष्ट्र गद्दार म्हणून ओळखतो, ज्यांना महाराष्ट्र खोके सरकार म्हणून ओळखतो त्यांच्यासोबत तुलना महाराजांची करणं, हा काही चुकून आलेला शब्द नाही, हे पूर्णपणे नियोजित आहे. हे पूर्ण या सरकारचं आणि पक्षाचं नियोजन दिसतं की, महाराष्ट्राचं खच्चीकरण करावं.

राज्यपाल जे बोलतात तेच हे मंत्री आज बोलले आहेत. ही सगळी वस्तूस्थिती लोकांसमोर आलेली आहे. म्हणजे तुम्ही महाराजांची तुलना अशी करता का? हा महाराजांचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे.  असेही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

नेमकं काय म्हणाले मंगलप्रभात लोढा ?
छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. परंतु शिवरायांनी स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले, पण एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी बाहेर पडले.