गंगाखेडच्या रासपच्या जागेवर आता भाजपचा डोळा 

परभणी : रासपचे नेते महादेव जानकर व भारतीय जनता पक्ष यांच्यात सध्या अंतर आल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आता गंगाखेड विधानसभा मतदारसंघातही स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्या गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत. मात्र आता भाजपने या मतदारसंघात आपली ताकत लावण्यास सुरुवात केल्याने आता गुट्टे यांच्या अडचणी वाढतील असे दिसत आहे.

प्रदेश भाजपचे कार्यकारिणी सदस्य संतोष मुरकुटे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने नुकतेच गंगाखेड येथे केलेले शक्तिप्रदर्शन म्हणजे भाजपच्या आगामी रणनीतीची पायाभरणी असल्याचे मानले जात आहे. या कार्यक्रमास उपस्थित असलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड या दोघांनीही गंगाखेडची जागा भारतीय जनता पक्षाला सोडवून घेण्याचा शब्द तर मुरकुटे यांना दिलाच, पण त्यांना ‘कामाला लागा’ असा संदेश देत या मतदारसंघात उद्याचा आमदार हा भाजपचा असेल अशी ग्वाही देऊन टाकली आहे.लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.