‘एनएसयूआय’मधून अभिजित गोरे निलंबित

पुणे : पक्षविरोधी काम केल्याने नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयूआय) प्रदेश सचिव पदावरून, तसेच काँग्रेस पक्षातून अभिजीत गोरे (Abhijit Gore) यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे ‘एनएसयूआय’चे  महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ऍड. उमेश खंदारे यांनी कळवले आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व संघटनेच्या विरोधात खुलेआम विरोधी पक्षाचा प्रचार करतानाचे फोटो संघटनेकडे प्राप्त झाले असून, गोरे यांची ही कृती पक्ष व संघटनेला अशोभनीय, तसेच मारक आहे. गोरे यांच्या या कृत्याची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमीर शेख यांच्या आदेशानुसार पुढील पाच वर्षांकरिता निलंबित करण्यात येत असल्याचे खंदारे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप व पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनाही ‘एनएसयूआय’च्या वतीने या निर्णयाची प्रत पाठवण्यात आली आहे.