हनुमान चालिसा वाचण्यासाठी उद्या मातोश्रीवर जाणारच; नवनीत राणा यांचा निर्धार

मुंबई – राज्यात सध्या भोंगे आणि त्याबरोबर हनुमान चालीसा जोरात चर्चेत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असताना अमरावतीचे राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे.

दरम्यान, राणा दाम्पत्य आज खार येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. यानंतर मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी मंजुनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याची भेट घेऊन मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कुठलेच काम करू नका, असं आवाहन करीत नोटीस बजावली.

बाळासाहेब ठाकरे हे असते तर त्यांनी आमचे स्वागत केले असते. शिवसेनेला बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. कितीही विरोध झाला तरी उद्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले. आम्हाला होणाऱ्या विरोधाची पर्वा न करता आम्ही हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले.

हनुमान जंयती दिवशी मुख्यमंत्री यांनी हनुमान मंदिरात प्रार्थना केली नाही, त्यांनी हनुमान चालीसा वाचावी. आम्हाला नाव स्मरण करण्यासाठी, हनुमान चालीसा पठण करण्यास कोणीही रोकू शकत नाही. असे राणा दाम्पत्यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.