ओपनिअन पोलने भाजपची चिंता वाढवली, पंजाबामध्ये सुफडासाफ तर यूपीत…

मुंबई : पाच राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू झाला आहे. 10 फेब्रुवारीपासून मतदान होणार असून 10 मार्चला निकाल लागणार आहे. पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्येही राजकीय तापमान वाढले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकांपूर्वी एबीपी न्यूज सी वोटरनं पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेतून भाजपची चिंता वाढवणारे आकडे हाती आले आहेत. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार युपीमध्ये भाजपला सत्ता राखण्यात यश मिळू शकेल. मात्र त्यांच्या जागा लक्षणीय प्रमाणात घटतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे गोव्यातही भाजप पुन्हा कमळ फुलवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मात्र नुकत्यात गोव्यातील भाजपच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्यानं तिथल्याही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर मणिपुरात भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळू शकेल, असं अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे.

एबीपी न्यूज सी वोटरनं केलेल्या सर्व्हेमध्ये पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला चाळीस टक्के तर काँग्रेसला 36 टक्के मतं मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आम आदमी पार्टीला 52-58 इतक्या जागा मिळतील, तर काँग्रेसला 37 ते 43 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपला एक ते तीन जागी विजय मिळू शकतो, अशी शक्यता आहे. तर अकाली दल 17 ते 23 जागी बाजी मारेल, असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे.

तिकडे उत्तरप्रदेशमध्ये देखील भाजपचे कमळ कोमेजणार असल्याचा अंदाज या सर्व्हेतून वर्तविण्यात आला आहे. यंदा भाजपला 223 ते 235 जागा मिळण्याची शक्यता या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. तर 2017 च्या तुलनेत समाजवादी पार्टीला 100 जागा अधिक मिळून, 145 ते 157 जागांवर विजयाचा अंदाज व्यक्त केला जातोय. तर काँग्रेसला मात्र केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावं लागेल असं या ओपिनियन पोलमध्ये सांगितलं गेलं आहे.