दापोडी महावितरण कार्यालयात थकबाकीदार ग्राहकाची शिवीगाळ; फौजदारी गुन्हा दाखल

पुणे- थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यामुळे महावितरणच्या दापोडी कार्यालयात येऊन शिवीगाळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या पिंपरी विभाग अंतर्गत दापोडी शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी (दि. २३) दापोडी येथील काटे रेसीडेन्सीमधील थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर दुपारी हे सर्व कर्मचारी दापोडी कार्यालयात काम करीत होते. त्यावेळी आदर्श शिंदे नामक व्यक्तीने कार्यालयात येऊन काटे रेसीडेन्सीमधील घराचा वीजपुरवठा का खंडित केला असे जोरजोराने ओरडून शिवीगाळ सुरु केली.

त्याने एका महिला कर्मचाऱ्याकडून थकबाकीदारांच्या नावाची यादी व मोबाईल हिसकावून घेतला व फेकून दिला तसेच कार्यालयातील सर्वांना दमदाटी केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी या आरोपीविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात कलम ३५३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.