“शुद्ध, अशुद्ध भाषा असं काही नसतंय, माझी भाषा ही माझी आहे”, नागराज मंजुळेंचं परखड मत

मुंबई- सोमवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मुंबई टाइम्स कार्निव्हल २०२३’च्या समारोप समारंभ पार पडला. या समारंभाला दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांसह शुद्ध आणि अशुद्ध भाषा, यावर परखड मत मांडले.

अभिनेते व कवी किशोर कदम यांनी खुमासदार शैलीत विचारलेल्या सर्व प्रश्नांना नागराज यांनीही तितकीच दिलखुलास उत्तरं देत विद्यार्थ्यांसह उपस्थितांची मनं जिंकली. यादरम्यान किशोर कदम यांनी विचारलेल्या भाषेवरील प्रश्नाचे उत्तर देताना नागराज मंजुळे म्हणाले, ‘शुद्ध असं काही नसतंय. शुद्ध ही संकल्पनाच अत्यंत फालतू आहे. माझी भाषा ही माझी आहे. त्यामुळं शुद्ध, अशुद्ध असं काही नसतं. मुळात जगभरात कुठंही अशुद्ध भाषा हा प्रकारच नसतोय.’

‘अमेरिकी भाषातज्ज्ञ नोम चॉम्स्की यांच्या शब्दांत सांगायचं तर भाषेचा हेतू हा शुद्ध ठरवणं, असा नसतो, तर संवाद साधणं असतो,’ असंही नागराज मंजुळेंनी म्हटलं.