पंतप्रधानांनी देशातील जनतेचा विश्वास गमावला; काँग्रेसचा दावा

मुंबई – शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन काळे कृषी कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले हा शेतकऱ्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा, त्यांनी वर्षभर केलेल्या संघर्षाचा विजय आहे. पंतप्रधानांनी कायदे मागे घेत असल्याचे जाहीर करुनही जोपर्यंत संसदेत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकरी त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही हा पंतप्रधानांनी शेतकरी व जनतेचा विश्वास गमावल्याचे द्योतक आहे, असे माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्यानंतर प्रदेश काँग्रेसने आज राज्यभर ‘किसान विजय दिवस’ साजरा केला. मुंबईत टिळक भवन येथे फटाके वाजवून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुनाफ हकीम, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, प्रमोद मोरे, रमेश शेट्टी, सचिव राजाराम देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.